अभिनय कट्ट्याविषयी

अभिनय कट्टा | कला गुणांना वाव देणारे खुले व्यासपीठ

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ठाणे शहराची ओळख गेल्या काही वर्षात प्रस्थापित होत आहे. हि ओळख निर्माण होण्यासाठी ज्या संस्थाचा मोलाचा वाटा आहे, त्यातील महत्वाची संस्था किंवा चळवळ म्हणजे 'अभिनय कट्टा'. ठाणे शहरात प्रवेश करताक्षणीच कला रसिकांना अत्यंत जवळ असणारे सांस्कृतिक केंद्र म्हणजे "अभिनय कट्टा" ! अभिनय कट्ट्याची स्थापना कला , सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील एक परिचित नाव असलेल्या श्री. किरण नाकती यांनी २७ फेब्रुवारी २०११ रोजी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून 'आदित्य प्रतिष्ठान, ठाणे' या संस्थेच्या माध्यमातून केली.

पहिल्या अभिनय कट्ट्यावर पहिले सदरीकरण करणार्‍या कलाकाराला कट्टयाच्या आशिर्वादाने पुढे यश मिळाले. महाराष्ट्राचा लाडका जावई अशी ओळख असलेला ' निरंजन कुलकर्णी ' म्हणजेच झी मराठी वरील " जावई विकत घेणे आहे " या मालिकेचा नायक " राया " हा अभिनय कट्टयाचा पहिला कलाकार. याशिवाय कट्ट्याच्याच 'आशिष जोशी ' याने " उंच माझा झोका " , " गुंतता हृदय हे " मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. कट्ट्याची बाल कलाकार असलेल्या ' मृण्मयी सुपाळने ' "असावा सुंदर स्वप्नांचा बंगला " या मालिकेमध्ये तसेच " तू माझा सांगाती " या मालिकेमध्ये ' आउली ' ही व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. कट्टयाच्या ' मंजुश्री धरुरे ' यांनी " लक्ष्मी vs सरस्वती " या मालिकेत महत्वाची भूमिका केली होती.कट्टयाचा बालकलाकार ' अथर्व नाकती ' याने " झालाय दिमाग खराब " व " SLAMBOOK " हे चित्रपट, तसेच " लक्ष्य "," क्राईम डायरी "," मन उधान वार्‍याचे "," गंध फुलांचा गेला सांगून " या मालिकांमध्ये काम केले असून सध्या तो " का रे दुरावा " या मालिके मध्ये भूमिका करत आहे . कट्टयाची कलाकार ' प्रियांका राऊत ' सह्याद्री वाहिनीवरील " वामानाश्रम " या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. ' आदित्य हळबे ' याने " दान मोठे कन्यादान " हा चित्रपट तसेच " क्राईम पेट्रोल ", " सी.आय.डी. "," लक्ष्य " या मालिकेत भूमिका साकारल्या आहेत व " द्वंद्व " , " ए...आपण चहा घ्यायचा ? " हि नाटके केली आहेत.

कट्टा सुरु करतानाच जुन्या, ज्येष्ठ लेखकांच्या दर्जेदार कलाकृती आणि साहित्य कट्ट्याच्या कलाकारांच्या माध्यमातून लोकांसमोर याव्यात असे श्री. किरण नाकती यांच्या डोक्यात होतेच. त्याला पुष्टी मिळण्यासाठी आणखी एक कारण म्हणजे कलाकारांना येणारी शब्दांची - भाषेची व चांगल्या संहितेची अडचण. उत्तम कलाकार महणून घडण्यासाठी भाषेवर प्रभूत्व हवेच. त्या करिता वाचन उत्तम हवे. या हेतूने कट्टयावर कट्टयाच्या सदस्य कलाकारांसाठी मोफत ग्रंथालय सुरु करण्यात आले .सर्व जेष्ट लेखकांच्या उत्तम कथा व एकांकिका / नाटके यांची पुस्तके ग्रंथालयात संग्रहित करून ठेवण्यात आली आहेत. ' सवाई ' या मनाच्या एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सर्व (१९८८ पासूनच्या ) एकांकिकांचा संग्रह वाचनालयात करण्यात आला आहे.

२०११ पासून सुरु झालेल्या कट्ट्यावर " गोष्ट प्रेमाची " , " दरवेशी " , " नोकरी मिळाली रे... " , " कथुली " यांसारख्या एकांकिका, एकपात्री, द्विपात्री सादरीकरण, एकांकिका / नाटकांचे अभिवचन २०११ - १२ या वर्षात झाले. जेष्ठ लेखक डॉ. मुरलीधर गोडे, डॉ. र. म. शेजवलकर, जेष्ठ अभिनेते ' उदय सबनीस ' , दिग्दर्शक ' विवेक देशपांडे ' यांचे मार्गदर्शन कट्ट्याला लाभले.

२०१२ डिसेंबरमध्ये अभिनय कट्टया तर्फे राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याचवेळी कट्ट्याने " राजा जो जो रे " , " प्लॅनचेट " , " नाटक बसते आहे " , " हिंदवी प्रपतो कोसळावा " , " निशब्द रात्र " यासरख्या एकांकिकेच्या बरोबरीने अंतर्गत अभिवाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा राबविल्या आहेत. कलाकारांनी वर्षभर केलेल्या कामाबद्दल कौतुकाची थाप पाठीवर देण्यासाठी २०१३ सालापासून ' सन्मान सोहळा ' सुरु करण्यात आला. पहिल्या सन्मान सोहळ्य मध्ये कट्टयाचा हरहुन्नरी कलाकार " कदीर शेख " यास ' सर्वोत्कृष्ट अभिनेता ' , ' सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ' , ' सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्त्व ' , ' अशा ७ पुरस्कारांनी गौरविले गेले.

२०१३ - १४ सालची सुरुवातच नंदेश उमप यांच्या दणदणीत मुलाखतीने झाली. एव्हाना राज्यभर व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर कलाकार व रसिकांमध्ये पसरलेल्या अभिनय कट्टयाबद्दल अभिनयक्षेत्रातही कौतुकाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे विजू माने, मंगेश देसाई, सुनील गोडसे या कलाकारांनी कट्टयावर कलाकार - रसिकांशी संवाद साधण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावली.

२०१३ ऑगस्टमध्ये ' अखिल भारतीय नाट्य परिषद, ठाणे ' शाखेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेत अभिनय कट्ट्याने बाजी मारली.

२०१३-१४ या वर्षात कट्ट्यावर " तुका म्हणे अवघे सोंग " , " अनोळखी " ," पुरुषार्थ " ," प्रश्नचिन्ह " ," वो सात दिन " ," रमाच्या मित्राची गोष्ट ", "सजा –ए -मौत " ," शासन-पर-शासन " ," त्या चार भिंतींपलीकडे "," विट्नेस ऑफ लव्ह ", " अनास्थेशिया " , " तारुण्याच्या उंबरठ्यावर " ," रावणाचा वनवास " , " वस्त्रहरण होत आहे ", "कमिटमेंट " ," वेटिंग फॉर गोदो " या एका पेक्षा एक एकांकिका बरोबरच " पॉलिटिक्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट " ," टिक टिक " ," भिखमंगे " ," अकबर-बिरबल "," पप्पू पास " हो गया अशा उत्तम द्विपात्री व अनेक एकपात्री सदर झाल्या .

याच दरम्यान अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांचे आशिर्वाद कट्टयाला मिळाले. सर्वश्री ‘रमेश देव ‘ यांची देववाणी कट्ट्याने अनुभवली . श्री. अविनाश व सौ .ऐश्वर्या नारकर यांनी कट्ट्याला शुभेच्छा दिल्या व मुलाखतीतून कलाकारांना मार्गदर्शन केले .ज्येष्ठ लेखक आनंद म्हसवेकरांनी कट्ट्यावर येऊन रसिक प्रेक्षक व कलाकारांशी संवाद साधला .

एकीकडे कट्टयाचा प्रवास सुरु असतांनाच आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून कट्टयातर्फे विविध सामाजिक समस्यांवर पथनाट्ये अभिनय कट्टयाने सादर केले. .व्यसनमुक्ती ,बचतगट ,हुंडाबळी ,रेल्वे सुरक्षा ,नौपाडा पोलिसांच्या मदतीकरीता केलेले पथनाट्य यांचा विशेष गौरव झाला .

कट्टयाच्या वाढत्या लोकप्रतिसादामुळे व कट्टयावरील चोखंदळ प्रेक्षक व कलाकारांच्या प्रतिसादामुळे अनेक चित्रपटांचे प्रमोशन कट्टयावर करण्याला निर्माते पसंती देऊ लागले. या चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या निमित्याने अनेक कलाकारांनी कट्ट्यावर संवाद साधला .त्यांच्याही अनुभवाचा लाभ कट्ट्याच्या सदस्यांना झाला .यात " एकुलती एक " च्या निमित्ताने सचिन पिळगावकर ," पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा " च्या निमित्त्याने मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे ," बी.पी. " व " टाईमपास " च्या निमित्ताने रवि जाधव, " टपाल " च्या निमित्ताने नंदू माधव व वीना जामकर , " तेंडूलकर आऊट " च्या निमित्ताने अनिकेत विश्वासराव व संतोष जुवेकर अशा कलाकारांनी आतापर्यंत कट्ट्यावर उपस्थिती दर्शवली आहे . " फँन्ड्री " च्या निमित्ताने नागराज मंजुळे , " बायोस्कोप " च्या निमित्ताने बायोस्कोपची सर्व टिम ," अग बाई अरेच्या-२ " च्या निमित्ताने केदार शिंदे व सोनाली कुलकर्णी यांनीही उपस्थिती दर्शवली. हि सर्व वाटचाल करत असतांना श्री. किरण नाकती यांच्या कामाचा व अभिनय कट्ट्याचा गौरव विविध मानाच्या पुरस्कारांनी झाला.ज्यामध्ये ‘ठाणे गुणीजन’, ' एस ९ ’ वाहिनी तर्फे " समाजरत्न " तसेच , ' मलेशियन कल्चरल सेंटर ' चा मलेशियातील गौरव , दिगंबर जैन समाज तर्फे " समाजरत्न " हे विशेष उल्लेखनीय.

कट्ट्याचा हा सर्व प्रवास सुरु असतांना कट्ट्याला दिवसेंदिवस वाढणाऱ्या कलाकारांच्या प्रतिसादातून कट्ट्याची सदस्य संख्या वाढू लागली. नवोदित होतकरू व गुणवान कलाकारांना या क्षेत्राबद्दलच्या चुकीच्या समजूती मुळे भरकटू नयेत व अभिनय क्षेत्र म्हणजे ग्लॅमर व स्वैर वागणूक नसून संस्कार व संस्कृती जपत निष्ठेने काम करण्याचे क्षेत्र आहे. हे कलाकारांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रतिज्ञापत्र सुरु करण्यात आले .कट्ट्याच्या सदस्य कलाकारांनी फक्त कट्ट्यावरच नव्हे तर कट्ट्यातर्फे कुठल्याही मंचावर कामकरतांना आपली वागणूक कशी ठेवावी ही वर्तवनुकीची नियमावली प्रतिज्ञापत्रात दिली आहे . केवळ उत्तम कलाकार म्हणून घडण्यासाठीच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आधी उत्तम व्यक्ती म्हणून घडणे गरजेचे आहे .त्यामुळे फक्त अभिनय क्षेत्रासाठीच नव्हे तर संपूर्ण आयुष्यासाठीच हे प्रतिज्ञापत्र महत्वाचे आहे .

कट्ट्याच्या कलाकारांना व्यावसायिक मंचावर काम करण्याचा व त्या वातावरणाचा अनुभव मिळावा म्हणून ‘आम्ही रंगकर्मी ' हा उपक्रम अभिनय कट्ट्यातर्फे सुरु करण्यात आला .या माध्यमातून " वेटिंग फॉर गोदो " सारखी गाजलेली कलाकृती तसेच ," बाप गेला रे बाप गेला "," आयला गेम चुकला ", वि.वा.शिरवाडकर लिखित " नाटक बसते आहे " या धमाल विनोदी एकांकिका ," उत्सव लावण्यांचा " ," काव्यधारा " यासारखे वैविध्यपूर्ण कार्यक्रम रसिकांसमोर आणले गेले .याच शृंखलेमध्ये बायोस्कोप या चित्रपटातील कलाकार परीसंवादाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आले.

संचालाकाविषयी ....

श्री. किरण नाकती यांनी २३ वर्ष नाट्य, टेलीव्हिजन आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांत आपला ठसा उमटविला आहे.

 • राज्यस्तरीय एकपात्री स्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या आणि सादर केलेल्या "मला जगायचं आहे" या सादरीकरणाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
 • राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमध्ये किरण सरांनी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केलेल्या अनेक एकांकिकांनी उत्तम यश मिळविले आहे. " आक्रमण " या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट अभिनय, लेखन,दिग्दर्शन, प्रकाश योजना हि सर्व पारितोषिके मिळाली आहेत. याशिवाय " प्रश्न ", "रॅगिंग", "धम्माल एका नाटकाची", "देवदास तुका पारो मिळायची नाय" , "संशय गाथा " या सरांच्या आणखी काही एकांकिका.
 • महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत " अरे नाटक नाटक " या दोन अंकी नाटकात जी.के.मास्तर हि मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी किरण सरांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिकही मिळाले होते.
 • रंगात रंगला महाराष्ट्र अमुचा या वाद्यवृंदाचे लेखन - दिग्दर्शन श्री.किरण नाकती यांनी केले आहे.
 • अभिनेता म्हणून " वचन दिले तू मला " , " अवघाची संसार ", " कळत नकळत ", " क्राईमडायरी ", " बाजीराव मस्तानी ", " सोंगटी ", " अपराधी कोण " या विविध वाहिन्यांवरच्या मालिकांमध्ये सरांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, " सिद्धिविनायक महिमा " आणि " गोतावळा " या चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका साकारल्या .
 • हिंदी फिल्म " चांद के परे " याचे Associate Director म्हणून जबाबदारी सांभाळली.
 • " ठेंगा " या मराठी चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम पहिले आहे.
 • " क्राईमडायरी " चे Production Manager म्हणून काम सांभाळले आहे.
 • " एक संधी अजूनही " याचे Production सांभाळले आहे.
 • याशिवाय " मन उधान वाऱ्याचे " , " फिरुनी नवी जन्मेन मी " ," शुभंकरोती " या मालिकांच्या तसेच बालाजी फिल्म्सच्या " माझिया प्रियेला प्रित कळेना " ," रंग माझा वेगळा " अशा बरेच मालिकांसाठी कास्टिंगसाठी Casting director म्हणून काम केले आहे.

एकीकडे हा प्रवास चालू असतानाच " आदित्य प्रतिष्ठानच्या " माध्यमातून सामजिक भान जपत त्सुनामीग्रस्तांसाठी मदत, मोफत बालनाट्य, संस्कार वर्ग, शालेय व महविद्यालयीन गरजू विद्यार्थ्यांना मदत, जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग बांधवांना मदत, शिवजयंती निमित्त शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, २४ तास रक्तदान सेवा असे उपक्रम राबविले गेले.

ठाण्यातील काही हौशी व कलाप्रेमी तरुणांना घेऊन श्री. किरण नाकती यांनी २००० साली नटराज ग्रुप सुरु केला. पुढे नटराज ग्रुपचे आदित्य कलामंच आणि त्याचे आदित्य कला संस्थेत रुपांतर झाले. दिवसेंदिवस कलाकारांची संख्या वाढत गेली. संस्थेला विविध स्पर्धांची पारितोषिके मिळाली. पुढे आदित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून 'कलांगणची' स्थापना झाली. या माध्यमातून बच्चे कंपनीसाठी 'बालगोपाळांना मंच' उपलब्ध करून देण्यात आला. वाचनासाठी 'वाचनदराबर' उपलब्ध करून दिला.

याशिवाय श्री. किरण नाकती यांनी महाराष्ट्र सिने व टेलिव्हिजन सेनेचे उपाध्याक्ष म्हणून काम सांभाळताना सुमारे २००च्या आसपास कलाकारांना चित्रपटसृष्टीत काम करण्याकरता लागणारे " ARTIST CARD "काढून दिले. अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक, यांची प्रोडक्शनमध्ये असलेली थकबाकी मिळवून दिली आहे. शेकडो बेरोजगारांना चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विभागात रोजगार उपलब्ध करून दिला. मराठी कलाकारांना चित्रपटसृष्टीत जास्तीत जास्त प्राधान्य देण्यासाठी विविध आंदोलने केली. निर्मात्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या समाजकंटकांवर युनिअन मार्फत कठोर कारवाई केली. मराठी कलाकारांना डावलून पाकिस्तानी कलाकारांना संधी देणाऱ्या Production विरुद्ध आवाज उठवला.

या सर्व क्षेत्रात काम करत असताना श्री. किरण नाकती यांच्या लक्षात आले कि अनेक नवोदित कलाकारांना आपली गुणवत्ता लोकांसमोर आणण्यासाठी हक्काचा मंच आणि हक्काचा प्रेक्षक वर्ग मिळत नाही. गुणवत्ता असूनही कधी ती संधीअभावी तर कधी आर्थिक वा अन्य अडचणींमुळे लोकांसमोर प्रदर्शित करता येत नाही. त्यामुळे संधींच्या शोधात असलेल्या कलाकाराच्या अज्ञानाचा व हतबलतेचा फायदा काही चुकीच्या प्रवृतीचे लोक घेतात व या कलाकारांना चुकीचा मार्ग दाखवतात. त्यामुळे कलाकार भरकटतो त्यातून कला क्षेत्रच पूर्ण बदनाम होते.यावर उपाय किंवा मार्ग काढण्यासाठी कालकारांना कुठल्याही अडचणीशिवाय वर्षभर आपली गुणवत्ता रसिकांसमोर सादर करता यावी, यासाठी मंच उपलब्ध करून द्यावा अशी कल्पना श्री. किरण नाकती यांच्या डोक्यात आली व अभिनय कट्टा सुरु झाला .....

 • अभिनय कट्ट्याविषयी सेलेब्रिटिंच मत

  मी असेन किंवा नसेन, पण अभिनय कट्टा असाच बहरत राहील.

  रमेश देव ( अभिनेते )

 • अभिनय कट्ट्याविषयी सेलेब्रिटिंच मत

  अभिनय कट्ट्यासारखी चळवळ मी संपूर्ण भारतात कुठे बघितली नाही.

  श्रीया पिळगावकर ( अभिनेत्री )

 • अभिनय कट्ट्याविषयी सेलेब्रिटिंच मत

  अभिनय कट्टा म्हणजे सोन्याची खाण

  सोनाली कुलकर्णी ( अभिनेत्री )

फोटो गॅलरी

आपण ग्लॅमरच्या पाठी धावायचं नसतं, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ग्लॅमरच आपल्या पाठी धावत आले पाहिजे..

- किरण नाकती ( संचालक, अभिनय कट्टा - सिने-नाट्य दिग्दर्शक )